माळशिरस : सध्या कृषी क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी आहेत. यामध्ये प्रामुख्याने सध्या दुष्काळाची समस्या भेडसावत आहे़ गतवर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेला़ त्यामुळे सर्वसामान्य शेतकºयांचे आर्थिक नियोजन ढासळत आहे़ परंतु अनेक शेतकºयांना शेतीपूरक कुक्कुटपालनाच्या व्यवसायाने मोठा आधार मिळत असल्याचे दिसून येते.
अनेक शेतकरीशेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून संकरित गाई, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन करतात़ यंदा हेच व्यवसाय अर्थकारण सावरताना दिसत आहेत़ सध्या पोल्ट्री व्यवसायाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला असून, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या पाळल्या जात आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पावसाची अनिश्चितता सुरू आहे़ त्यामुळे तालुक्यातील ऊस, केळी बारमाही पिकांखालील क्षेत्रात घट झाली आहे़ सध्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होणे अशक्य आहे़ त्यातही सिंचनाखाली केलेल्या मका, ज्वारी आदींवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. काही शेतकरी भाजीपाला लागवड करून आर्थिक गणित मांडण्याचे प्रयत्न करतात, पण बाजारात कवडीमोलाने भाजीपाला विकावा लागत आहे़ अशा अनेक प्रकारच्या संकटामुळे कृषीचे अर्थकारण सुधारण्यासाठी शेतकरी शेतीपूरक व्यवसायांना लक्ष्य करीत आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी कुक्कुटपालन व्यवसायाकडे शेतकरी आकर्षित होत आहेत़ यामध्ये ब्रॉयलर, देशी, गिरीराज, वनराज, कडकनाथ अशा वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्यांचे पालन केले जात आहे़ या उद्योगासाठी वेगवेगळ्या कंपन्या शेतकºयांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. मात्र अलीकडील काळात या उद्योगातही वेगवेगळे आजार व बाजार भावाच्या तेजी-मंदीचा फटका बसत आहे़ सध्या तरी अनेक शेतकºयांनी लाखो रुपये गुंतवणूक करून ब्रॉयलर पक्षी पालन सुरू केले आहे.
पाण्याचा तुटवडा असल्यामुळे शेतीत इतर पिके घेणे शक्य नाही़ त्यामुळे बँक व कोंबड्या पुरविणाºया कंपनीच्या साह्याने शेड उभा करून ब्रॉयलर जातींच्या पक्ष्याचे पालन केले आहे. यातून शेतीसाठी खत व आर्थिक लाभही मिळत आहे, मात्र वाढते रोग व बाजार भावातील चढ-उतारामुळे या व्यवसायाला शेतकरी फारशी पसंती देत नाहीत.- शहाजी वळकुंदेकुक्कुटपालन शेतकरी, मेडद