सोलापूर : मागील जवळपास दीड वर्षांपासून एसटी स्थानकातील गर्दी खूप कमी झाली होती. यामुळे प्रवासीच नसल्यामुळे स्टँडवर विविध व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे पाणी बॉटल, पॉपकॉर्न, शेंगा व अन्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानदार आणि किरकोळ व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक अडचण झाली होती. पण, मागील काही दिवसांपासून एसटी स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे स्थानकात पुन्हा ‘पाणी बॉटल’, ‘ शेंगा घ्या ... शेंगा’, ‘पॉपकॉर्न घ्या’, असा आवाज घुमत आहे.
मागील काही दिवसांपासून स्टँडवर प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे एसटी प्रशासनासोबत स्टँडवरील विक्रेते यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येत आहे. मागील अनेक महिने व्यापाऱ्यांचे दुकान बंद असूनही त्यांना भाडे द्यावे लागत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत होती.
लॉकडाऊन काळात काही प्रमाणात गाड्या सुरू होत्या मात्र स्थानकातील सर्व दुकाने बंद होते. यामुळे प्रवाशांना स्टँडवर पाण्याशिवाय काहीच मिळत नव्हते. सध्या एखादी गाडी जरी स्टँडवर आल्यानंतर त्या गाडी सभोवताली तीन ते चार पाणी विक्रेते आणि काही शेंगा विक्रेते घोळका करून थांबत आहेत.
लॉकडाऊन सर्व दुकाने बंद असल्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच स्टँडवरील प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करूनही आम्हाला विशेष परवानगी देण्यात आली नव्हती. पण सध्याला वेळेची मर्यादा वाढल्यामुळे व्यवसाय सुरळीत होत आहे.
अमर कटारे, व्यावसायिक
सध्या सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत स्टँडवर गर्दी असते. त्यामुळे त्या वेळात थोडा व्यवसाय होतो. त्यानंतर मात्र क्वचितच ग्राहक येतात. पूर्वीच्या तुलनेत सध्या खूप कमी ग्राहक आहेत.
अमित तांबे, विक्रेते