सोलापूर - दक्षिण रेल्वे विभागाकडून जाहीर झालेला सिकंदराबाद-पुणे वंदे भारत गाडी मार्चअखेर सुरू होण्याचे संकेत आहेत. तशी तयारी दक्षिण रेल्वे विभागाकडून सुरू आहे. ही गाडी सोलापूर रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे. गाडीचा वेळापत्रक आणि दर कसे असतील, याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दि. १० फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी सुरू झाली. त्यानंतर आता सिकंदराबाद पुण्याकरिता वंदे भारत सुरू होणार आहे. याचे सोलापूरकरांकडून स्वागत होत आहे. या गाडीमुळे सोलापूरकरांचा पुणे आणि हैदराबादचा प्रवास आणखीन सुखकर आणि गतिमान होणार आहे. पुण्याहून हैदराबादला जाण्यासाठी शताब्दी एक्स्प्रेसला (गाडी क्रमांक १२०२५-१२०२६) आठ तास २० मिनिटे लागतात.एकूण ६०० किलोमीटरचे अंतर असून, पुण्यानंतर सोलापूर, कलबुर्गी, वाडी, तांडूर, सिकंदराबाद तसेच बेगमपेठ या स्थानकावर ही गाडी थांबते. ही गाडी नेहमी हाऊसफुल्ल असते. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून साऊथ रेल्वेने सिकंदराबाद-पुणे वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वंदे भारत ही गाडी सिकंदराबाद येथून निघून तांडूरमार्गे वाडी, कुलबुर्गी, सोलापूर तसेच पुण्याकडे रवाना होईल. त्यानंतर हीच गाडी पुन्हा सोलापूरमार्गे सिकंदराबादकडे रवाना होईल. यामुळे सोलापूरकरांना पुणे आणि हैदराबादचा प्रवास एकाच दिवसात करता येईल.