गेल्या तीन दिवसांत वळसंग, धोत्री, मुस्ती, तांदूळवाडी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले नदीनाले भरून वाहत आहेत. सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी काढणी पूर्ण झाली असून मळणीसाठी शेतकरी धावपळ करीत आहेत, अशा स्थितीत पावसाने गाठले आहे. चार दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे. रात्री पाऊस आणि दिवसा ऊन या वातावरणात सोयाबीनचे पीक अडकले आहे. मळणीविना सोयाबीनला कोंब फुटताहेत. काढलेले सोयाबीन पाण्यात अडकल्याने हाती आलेले पीक मातीमोल होत आहे. मंद्रूप, औराद, माळकवठे, येळेगाव, कंदलगाव, गुंजेगाव आदी गावांमध्ये अपुरा पाऊस झाला आहे. या परिसरातील विहिरी, ओढे कोरडेठाक आहेत. आणखी पावसाची प्रतीक्षा आहे. सीताबाई तलाव अर्धवट भरलेला आहे. छोटे पाझर तलाव कोरडे आहेत. शेतकऱ्यांना वर्षभराच्या पाण्याची चिंता लागून राहिली आहे.
-------
रामपूर, हणमगाव तलाव अर्धवट
पावसाळा संपत आला तरी रामपूर तलाव अर्धवट भरलेल्या स्थितीत आहे. या तलावाच्या परिसरात पुरेसा पाऊस झाला नव्हता. मात्र, गेल्या चार दिवसांत पावसाने हजेरी लावली आहे. हणमगाव तलावाची स्थितीही फारशी वेगळी नाही. धुबधुबी प्रकल्प कोरडा होता. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने तलावात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.