११,५११ रुपयांचा राज्यात सर्वाधिक दर
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. आज लक्ष्मीच्या मुहूर्तावर बाजारात २५० कट्टे सोयाबीन दाखल झाले आहेत. या सोयाबीनला तब्बल ११,५११ रुपये प्रतिक्विंटल दर राज्यात सर्वाधिक दर बाजार समितीने दिल्याची माहिती बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी दिली.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती ही उतार मालाची बाजारपेठ म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भुसार मालाची मोठ्या प्रमाणात आवक होते. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहोळ तालुक्यातील काही भाग तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, कळंब व नगर जिल्ह्यातील जामखेड भागातील शेतमाल विक्रीसाठी येतो. तालुक्यातील ७० टक्के गावात सोयाबीनची लागवड वाढली आहे. याशिवाय कळंब, येडशी, भूम आदी घाटमाथ्यावरील भागातही विक्रमी सोयाबीन उत्पादन घेतले जाते. सध्या बाजारात उडदाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. आज पहिल्यांदाच या हंगामातील सोयाबीनची आवक झाली. उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगे येथील शेतकरी जारीचंद माने यांनी राहुल डोंगळे यांच्या अडतीवर आणलेल्या पाच कट्टे सोयाबीनला ११,५११ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यांच्या या पाच कट्टे सोयाबीनचे २८६ किलो वजन भरले. त्याची ३२,७९० रुपये पट्टी आली. सोयाबीन खरेदीदार अरुण मुंडे यांनी ते बाजारात बोली लावून लिलावात खरेदी केले.
बार्शीच्या बाजार समितीमध्ये पंधरा ते वीस मोठे विविध मालांचे खरेदीदार आहेत. यामध्ये ज्येष्ठ उद्योगपती दिलीप गांधी यांचे दर्शना पल्सेस, दामोदर काळदाते यांचे आदेश ट्रेडर्स, प्रवीण गायकवाड यांचे धीरज ट्रेडर्स, जितेंद्र माढेकर यांचे निनाद ट्रेडर्स, सचिन मडके, संतोष बोराडे, अरुण मुंडे या प्रमुख खरेदीदारांचा समावेश आहे.
आज बाजारात आलेल्या २५० कट्टे सोयाबीनमध्ये कमीत कमी आठ हजार रुपये, तर जास्तीत जास्त ११,५११ रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. सोयाबीनला चांगला दर मिळाला असला तरी उडदाच्या दरात मात्र घट झाली आहे. मागील आठवड्यात सात हजार पाचशेच्या पुढे असलेला उडीद आता तीन हजारांपासून ६,५०० रुपयेपर्यंत विकला जात आहे. मागील दहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे उडीद पिकाला फटका बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून उडदाच्या दरात क्विंटलमागे ७०० ते ९०० रुपये घट झाली आहे. पावसात न भिजलेल्या चांगल्या उडदाला अद्याप चांगला दर मिळत असल्याचे मर्चंट असोसिएशनचे सचिव महेश करळे यांनी सांगितले.