सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील यंत्रणा अत्यावश्यक सेवेसाठी सज्ज झाली आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन अभियंता व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत. अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून विशेष पथके (अभियंता/कर्मचारी/जनमित्र) निर्माण करण्यात आली असून घरी बसलेल्या लोकांसाठी २४ तास सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणची यंत्रणा कटिबद्ध असल्याची माहिती सोलापूर महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ ला दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जमावबंदी, संचारबंदीचा आदेश तसेच घरुनच काम (वर्क फ्रॉम होमचा) निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याप्रमाणे महावितरणकडून विविध उपाययोजनांसह वीजपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांत ५ टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी प्रामुख्याने अभियंता आणि तांत्रिक कर्मचारी (जनमित्र) सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहेत.
कोरोनासंदर्भातील खर्चाचे अधिकार कार्यालय प्रमुखांनाप्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाºया अभियंता व तांत्रिक कर्मचाºयांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच कार्यालय प्रमुखांना मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनेटायझर खरेदी करण्यासाठी खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. यासोबतच दुरुस्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनमित्रांनी स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र काही गंभीर तांत्रिक बिघाडामुळे वेळ लागल्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी किंवा अन्य सेवेसाठी महावितरणच्या कार्यालयात येऊ नये. किंबहुना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडूच नये. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास किंवा अन्य महत्त्वाची तक्रार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता