सोलापूर :सोलापूर ते पुणे रेल्वे ट्रॅकचे अपग्रेडेशन काम प्रस्तावित असून, अपग्रेडेशननंतर वंदे भारत १३० किलोमीटरने धावणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी ३० ते ४० मिनिटं तर पुण्यासाठी कमीत कमी २० मिनिटं वेळ वाचणार आहे, अशी माहिती सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे यांनी मंगळवारी दिली.
१० फेब्रुवारीला वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. मागील दहा दिवसांत वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळाला असून, याची माहिती देण्याकरिता नीरजकुमार दोहरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी वरील माहिती दिली. वंदे भारतची गती प्रती तास १६० किमी आहे; परंतु सोलापूर ते पुणे व पुणे ते मुंबई रेल्वे ट्रॅकचे अपग्रेडेशनचे काम प्रस्तावित आहे.
काही ठिकाणी अपग्रेडेशन झाले आहे. सध्या सोलापूर येथून वंदे भारत सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटते. पुणे स्टेशनवर ९ वाजून १५ मिनिटांनी पोहोचते. तर मुंबईला दुपारी साडेबारा वाजता पाेहोचते. साडेसहा तासांत मुंबईला वंदे भारत पोहोचते. पुढील काळात साडेपाच ते पावणेसहा तासात वंदे भारत मुंबईला पोहोचू शकते. त्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.