सोलापूर, :- येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पालखीमार्ग तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या कामांना गती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सेतू सभागृहात जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, समन्वय अधिकारी प्रवीण साळुंके उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गांमध्ये संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, संत तुकाराम पालखी मार्ग यांचा प्रत्येक तालुक्यानुसार आढावा डॉ. भोसले यांनी घेतला. तसेच सांगली-सोलापूर, टेंभुर्णी-करमाळा, म्हसवड-पंढरपूर, सोलापूर-अक्कलकोट आदी प्रमुख रस्त्यांची कामे, सर्वेक्षण, मोजणी व भूसंपादन प्रक्रिया या बाबींची माहिती डॉ. भोसले यांनी घेतली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.