संपूर्ण मोहोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत किंगमेकर अशी ओळख असलेल्या नरखेड जि. प. गटातील नरखेड गावची ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणाच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव, निवडणुकीत होणारा अमाप खर्च, गावात होणारे वादविवाद टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास करण्यासाठी या वर्षाची ग्रा. प. निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रस्ताव जि.प. सदस्य तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मांडला. या प्रस्तावास गावातील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींनी संमती दर्शवून गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरामध्ये बैठक पार पडली.
गावच्या सर्वांगीण विकासासाठी गट - तट बाजूला ठेवून ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक अभियान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन ‘लोकशाही समृद्ध’ करण्यासाठी व बक्षिसाचे मानकरी होण्यासाठी शांतताप्रिय मार्गाने हातभार लावावा, असे आवाहन उमेश पाटील यांनी केले.
यावेळी ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरात भरलेल्या बैठकीमध्ये सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी गावच्या विकासासाठी, हितासाठी आणि वादविवाद टाळण्यासाठी सर्वांनी एक पाऊल मागे घेऊन, ग्रामपंचायत बिनविरोध करून बक्षिसाचे मानकरी होण्याचा निर्धार केला.
यावेळी जि. प. सदस्य - उमेश पाटील, प्रमोद गरड, जयवंत पाटील, संतोष पाटील, चेतन पाटील, हरिभाऊ खंदारे, डॉ. उमेश मेंडगुळे, अशोक धोत्रे, बाळासाहेब पाटील, बबन दगडे, विनोद पाटील, राहुल कसबे, दत्तात्रय सोनार,लक्ष्मण राऊत, उत्तम मोटे, कुमार पाटील, सुनील भडंगे, प्रकाश राऊत, ज्ञानेश्वर ताकमोगे, डॉ. सुरेश मोटे, शाहू धोत्रे, दिलीप मोटे, महेश राऊत, सुरेश उबाळे, रमेश मोटे आदी सर्वपक्षीय ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी आभार सोसायटीचे चेअरमन जयवंत पाटील यांनी मानले.
----