पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गादेगाव, कासेगावसह मंगळवेढा तालुक्यांतील काही गावांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी प्रचारसभा घेतल्या. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, उमेदवार समाधान आवताडे, भाजपचे संघटनमंत्री बाळा भेगडे, सुनील सर्वगोड, माउली हळणवर यांच्यासह घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या हक्काच्या वीज, पाणी प्रश्नांवर राजकारण करीत आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे. सरकारमधील कोणत्याही गोष्टीमध्ये एकवाक्यता नाही. तर अधिकारी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करतात. रोहित्रे उतरवून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. पाणीप्रश्नावर राज्य सरकार याच न्यायाने वागत असल्याने राज्यातील सर्वसामान्य जनता, नागरिक सरकारच्या विरोधात वैतागले असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.
----
सरकारमधील बेबनावामुळे मंत्री घरी बसले
राज्य सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्ट आहेत. म्हणूनच त्यांच्याविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या जात आहेत. त्याची दखल घेऊन न्यायालयाकडूनही चौकशी आयोग नेमून चौकशा केल्या जात आहेत. हा प्रकार मागील सरकारच्या काळात कधीही घडला नाही. सरकारमध्ये असलेल्या या बेबनावमुळे अनेक मंत्र्यांना घरी बसावे लागत असून त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास उठत आहे. राज्याचा विकासाचा गाडा थांबला आहे, तो पुन्हा रुळांवर आणायचा असेल तर हे सरकार घालवले पाहिजे, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.