राकेश कदम, साेलापूर: राज्यातील खासगी सूतगिरण्यांचा ताेटा वाढत आहे. शासनाने यावर चर्चा काढण्यासाठी सर्व खासगी सूतगिरणी प्रतिनिधींची बैठक बाेलवावी अन्यथा सर्व सूत गिरण्या बेमुदत बंद ठेवण्यात येतील असा इशारा महाराष्ट्र खासगी स्पिनिंग मिल्स असाेसिएशनने दिला आहे.
स्पिनिंग मिल्स असाेसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. महाराष्ट्र हे देशात कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. या कापसापासून सूत तयार करण्याचे काम स्पिनिंग मिल्स करीत आहेत. सध्या सूताची निर्यात हाेत नाही. स्थानिक बाजारात मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने सूतदर प्रचंड घसरले आहेत. कारखानदारांना प्रति किलाे ३० ते ४० रुपये ताेटा हाेत आहे. मागील सहा महिन्यांपासून कारखानदार हा ताेटा सहन करीत आहेत. सर्वच कारखान्यांचे आर्थिक गणित काेलमडले आहे. यावर ताेडगा काढण्यासाठी सरकारने बैठक बाेलावणे आवश्यक आहे. अन्यथा सूतगिरण्या बंद ठेवण्यात येतील, असा इशारा स्पिनिंग मिल्स असाेसिएशनचे चेअरमन आमदार संजयमामा शिंदे आणि सचिव संजय जमदाडे यांनी दिला.