रवींद्र देशमुखभारतीय संस्कृती आणि अध्यात्म हे मूळातच सण, उत्सवांना जोडले गेलेले आहेत. आनंदाची निर्मिती आणि देवाण - घेवाण अधिकाधिक व्हावी, हाच या साºयांचा उद्देश आहे. नवरात्रीचा जागर आणि त्या काळातील गरबा - दांडिया यातूनही सामुदायिक आनंद मिळतो. एकमेकांच्या भेटीगाठी होतात. विचारांचे आदान - प्रदान होते. कोजागरी पौर्णिमाही असाच माणसांना जवळ आणणारा सण आहे. अश्विन महिन्यातील या शरदाच्या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी माता घरी येते आणि कोण जागत आहे? असे विचारून लोकांना धनाचे दान करते, अशी आपल्याकडे मान्यता आहे असे पंचांगकर्ते मोहन दाते ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते.
दाते म्हणाले की, कोजागरी पौर्णिमेबाबत अनेक पौराणिक कथाही आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध प्रकारे कोजागरीचे जागरण केले जाते. या काळात काही मंडळी कुलदैवतेची उपासना करतात. नामस्मरण करतात. अध्यात्मिक सांप्रदायाशी संलग्न असलेले भाविक आपल्या गुरूगृही जाऊन सामुदायिकपणे उपासना आणि जप करतात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून पौर्णिमेच्या चंद्राची किरणे पडलेले दूध प्राशन करतात.
पुराणामधील कथनानुसार या रात्री लक्ष्मी घराघरात येते. लक्ष्मीचे आपल्या निवासस्थानी आगमन होत असताना आपण सारेच जागे असायला हवे; मग हे जागरण उगीचच गप्पा मारत करण्यापेक्षा उपासना किंवा सांस्कृतिक आयोजनातून झाले तर अधिक उत्तम, असेही ते म्हणाले. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी घराच्या अंगणात आकाश कंदिल लावण्याचीही पध्दत आहे. कोजागरी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे आकाश कंदिल लावण्याची परंपरा आहे. हल्ली काही कुटुंबंही ही परंपरा जाणीवपूर्वक पाळतात, असेही दाते यांनी सांगितले.
कोजागरीचे महत्त्वपंचांगकर्ते दाते यांनी सांगितले की, शरद ऋतू हा पित्त आणि उष्णता वाढविणारा ऋतू आहे. त्यामुळे या काळात बहुसंख्यांना पित्ताचा त्रास जाणवतो. काहीजण उष्णतेच्या त्रासाने त्रस्त असतात. या काळात दूध प्राशन करणे आरोग्यासाठी हितकारक आहे. त्यामुळे कोजागरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दूध प्राशन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे ते म्हणाले. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. या काळात दमा आजाराचे औषध लागू पडत असल्याचे आयुर्वेदशास्त्राने नमूद केले आहे.