मंगळवेढा नगर परिषदेत मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या उपस्थितीत व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. त्याबैठकीत सात दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
मंगळवारी वैद्यकीय सेवा, औषधालये, शासकीय कार्यालये वगळता एकही दुकान उघडे नव्हते. सर्वांनी स्वेच्छेने कडकडीत बंद पाळल्यामुळे मंगळवेढा शहर व परिसरातील रस्ते ओस पडले होते. यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
नगरपालिकेची यंत्रणा, भरारी पथके कार्यरत असल्याने व्यापाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. त्याचे सर्वांनी काटेकोर पालन केल्याचे दिसून आले.
----
सातजणांचे नेमले पथक
मंगळवेढा नगर परिषदेच्या हद्दीत व लगतच्या दोन ग्रामपंचायत परिसरात कोरोना संसर्गजन्य साथीने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. या संसर्गजन्य साथीला रोखण्यासाठी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनिअर तेजस सूर्यवंशी, मंडल अधिकारी एस.एस. जाधव, तलाठी उमेश सूर्यवंशी, ग्रामसेवक गोरख जगताप, एम.जी. पवार व पोलीस कर्मचारी, असे सात जणांचे पथक नेमले आहे.
कोट
आपण सर्वांनी एकजूट दाखविली व सहकार्य केले, तर कोरोनाला रोखणे शक्य आहे. ही वेळ गांभीर्याने घेण्याची आहे. विनाकारण कोणीही बाहेर फिरू नये, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करावा, नेहमी मास्कचा वापर करावा.
-निशिकांत परचंडराव, मुख्याधिकारी, मंगळवेढा
----
कारवाईसाठी स्वतंत्र पथक कार्यरत
मंगळवेढा शहर व लगतच्या संत दामाजीनगर व संत चोखामेळानगर या दोन ग्रामपंचायत हद्दीतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेच्या तपासण्याकामी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सात जणांचे एक पथक नेमले आहे. दरम्यान, हे पथक या भागात फिरून मंगल कार्यालय, मॉल, रेस्टाॅरंट, भाजी विक्रेते, ब्युटीपार्लर, शॉपिंग सेंटर आदी व्यावसायिक नियमांचे पालन करतात की नाही, करत नसल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईसाठी वरिष्ठांकडे हे पथक अहवाल सादर करणार आहे.
ओळी :::::::::::::::
मंगळवेढा येथे जनता कर्फ्यू असल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.