सोलापूर : सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातूनच बाजार समितीच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यानंतर पणन विभागाने सामाईक खात्यावर एकाच शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला.
हा आदेश बदलून सर्व शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी सहकारमंत्री गटाच्या कार्यकर्त्यानेच उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणीला सुरुवात होत नाही तोच पणन विभागाने आपला पूर्वीचा निर्णय मागे घेऊन सर्वांना मतदानाचा अधिकार देण्याचा नवा आदेश काढला आहे. या प्रक्रियेत जिल्हा प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. बाजार समितीची निवडणूकही आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आली. सामाईक खात्यातील नावे घेताना पहिल्या क्रमांकावरील शेतकºयाच्या नावाचा मतदार यादीत समावेश होता. त्याला विशेषत: काँग्रेसच्या सर्वाधिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन जिल्हाधिकाºयांकडे हरकती नोंदविल्या. १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार द्या, अशी मागणी त्यांनी केली.
या हरकतींवरील सुनावणी सुरु असतानाच डोणगाव येथील भाजपा कार्यकर्ते संजय भोसले यांच्यासह ११० शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत. सामाईक खात्यावर सर्वांना मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पणन विभागाने २० मार्च रोजी नवा आदेश काढून सामाईक खात्यावर भागाकार करुन १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचे आदेश दिले आहेत.
दीड महिन्यांनंतर जाग आलीप्रारुप मतदार यादी करतानाच सामाईक खात्याबाबत काय करायचे, असा प्रश्न निवडणूक कार्यालयांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सहकार प्राधिकरणाला विचारला होता. यावर प्राधिकरणाने एकाच शेतकºयाचा समावेश करा, अशी सूचना केली. आता याच पत्राचा संदर्भ देऊन दीड महिन्यांनी सर्व शेतकºयांचा मतदार यादीत समावेश करावा, असे आदेश दिले आहेत.
जिल्हा प्रशासन बुचकळ्यात, मागवले मार्गदर्शन- बाजार समितीची गणरचना, आरक्षण सोडत आणि प्रारुप यादी यासंदर्भात नव्याने प्रक्रिया राबवायची की आहे ती प्रारुप यादी कायम ठेवून पुरवणी यादी जोडायची यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागविले आहे. प्राधिकरणाकडून सूचना आल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
२७ मार्चपर्यंत मागविली यादी- सहकार प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांनी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा येथील तहसीलदारांना सामाईक खात्यावरील शेतकºयांची यादी तयार करण्याची सूचना केली आहे. ही यादी २७ मार्चपर्यंत बिनचूक पाठवावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.
प्राधिकरणाने अधिवक्त्यांना कळविले- पणन विभागाच्या नव्या आदेशानंतर सहकार प्राधिकरणाने राज्याच्या अधिवक्त्यांना पत्र पाठविले आहे. यात संजय भोसले यांच्या याचिकेचा संदर्भ दिला आहे. संयुक्त खातेदार असलेल्या प्रकरणात एकूण क्षेत्राला आणि एकूण संयुक्त खातेदारांच्या संख्येने भागल्यानंतर जर १० आरपेक्षा जास्त क्षेत्र येत असेल तर अशा संयुक्त ७/१२ वरील सर्व खातेदारांचा समावेश मतदार यादीत करण्याचे आदेश दिल्याचे या पत्रात नमूद केले आहे.