माढा : माढ्यात पिता-पुत्रासह तिघांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे़ त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जाते़ या घटनेनंतरही नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जागी झालेली दिसून येत नाही.
संतोष प्रतापराव साठे व त्यांचा मुलगा सोहम संतोष साठे असे डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या पिता-पुत्राचे नाव आहे़ तसेच उपळाई बुद्रुक येथील रमेश बंड यांना डेंग्यूसदृश आजार झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. साठे कुटुंबातील या दोघांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात हलविले आहे़ रमेश बंड यांना बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील आठवड्यात संतोष साठे यांचा मोठा मुलगा सूरज यालाही डेंग्यूसदृश आजार झाला होता़ त्याच्यावर उपचार करण्यात आले़ त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने लोकवस्तीच्या ठिकाणी फवारणी करण्यात यावी. परिसरातील गटारीत पावसाचे पाणी साठते आहे़ परिणामत: आजाराची लक्षणे अनेकांमध्ये दिसत आहेत.
माढ्यातील संतोष साठे व सोहम साठे यांना मंंगळवार, ३ सप्टेंबर रोजी ताप व डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने माढ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी दोघे डेंग्यूसदृश लक्षणे दिसताच चाचणी केली गेली़ चाचणीच्या अहवालावरुन त्यांना डेंग्यूसदृश आजार असल्याचे सांगितले गेले़ दोघांना पुढील उपचारासाठी सोलापुरात हलवण्यात आले.
सोहम व संतोष साठे या दोघांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याची माहिती पुढे आली असून याबाबत वरिष्ठांना कळविले आहे़ त्यांच्या कुटुंबीयांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करणार आहोत़ परिसरातील नागरिकांनी स्वच्छता घ्यावी, आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे़ - डॉ. नंदकुमार घोळवेवैद्यकीय अधिकारी, माढा ग्रामीण रुग्णालय