तीन संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकावर बारलोणी (ता. माढा) येथे शुक्रवारी जमावाने हल्ला केला. त्यामध्ये पथकातील तीन पोलीस जखमी झाले व जमावाकडून पोलीस गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. घटना घडल्यानंतर त्यात सामील असणाऱ्या सर्व हल्लेखोरांनी गावातून पलायन केले. याबाबत बारलोणीतील ११ मुख्य आरोपींबरोबरच इतर ५० जणांवर कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्वतः फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. गावाला पोलिसांचा वेढा देत कोम्बिंग ऑपरेशनही केले. पण पलायन केलेल्या त्या हल्लेखोरांपैकी एकही हल्लेखोर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री उशिरापर्यंतही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केले असून, लवकरच सर्व हल्लेखोरांना बेड्या ठोकणार असल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.