सोलापूर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (रा. जवळा, ता. सांगोला) याच्या विरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी एका अधिकाऱ्यासह पाच पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक त्याच्या मागावर रवाना झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या पथकात फौजदार सचिन माळी यांच्या नेतृत्वाखाली एक महिला कर्मचाऱ्यांसह पाच जणांचे पथक असून, हे पथक त्याच्या मूळगावी गेल्यानंतर तो तेथे आढळला नाही. सध्या तो लपला असल्याचा संशय पोलसांनी व्यक्त केला. दरम्यान, आरोपी श्रीकांत देशमुख याने लग्नाचे आमिष दाखवत ३२ वर्षीय पीडित महिलेवर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात अनैसर्गिक अत्याचार व मुंबई, पुणे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये २०२१ ते मे २०२२ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला. त्याने आपले, आपल्या पत्नीशी पटत नसून, आपण पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर पीडितेशी विवाह करू, असे सांगितले. त्यानंतर त्याने लग्नाचा बनाव केला, अशी फिर्याद पीडितेने दिली आहे. दरम्यान, याबाबत पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तेथून हा गुन्हा सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
पोलिसांनी पीडितेशी साधला होता संपर्क
पीडित महिलेने या घटनेची माहिती एका व्हिडिओद्वारे दिली होती. याची दखल महिला आयोगाने घेत याबाबत कारवाई करण्याची सूचना सोलापुरातील पोलिसांना केले हाेते. त्यानंतर येथील पोलिसांनी पीडितेशी संपर्क साधल्यानंतर तिचा मोबाइल बंद लागला. त्यानंतर पोलिसांनी पीडितेने ज्या ई-मेलवरून संपर्क साधला होता, त्याच ई-मेलवर संपर्क साधल्यानंतरही तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नव्हता. दरम्यान, पीडितेने पुण्यात याबाबतचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा गुन्हा आपल्याकडे वर्ग झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.