सोलापूर : महापौरपदासाठी भाजपकडून श्रीकांचना यन्नम की अंबिका पाटील यावरून नगरसेवकांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. विजयकुमार देशमुख यांची कोंडी करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, नागेश वल्याळ आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सुरू केला आहे. दरम्यान, भाजपच्या या दोन उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेत महाआघाडीची चर्चा हवेतच विरण्याची चिन्हे आहेत.
महापौरपदासाठी शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करायचा आहे. मनपात भाजपचे ४९ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी ५२ सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपने श्रीकांचना यन्नम यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेचे १४ नगरसेवक पाठिंबा देतील, असा निरोप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी भाजप नेत्यांना पाठविला होता.
श्रीकांचना यन्नम या कोठे यांच्या कुटुंबातील आहेत. त्यांना संधी मिळाल्यास पालिकेत पुन्हा कोठेंचे वर्चस्व राहील. कोठे यांना विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. भाजपने नगरसेविका अंबिका पाटील यांना उमेदवारी दिल्यास सहा नगरसेवक बिनशर्त पाठिंबा देतील, असा निरोप माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांना पाठविण्यात आला आहे. हे सहा नगरसेवक शुक्रवारी देशमुख यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेतील कुरघोड्यांच्या राजकारणामुळे भाजपचा महापौरपदाचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.
श्रीकांचना यन्नम यांचे नाव निश्चित ?- दरम्यान, महापौरपदासाठी भाजपकडून श्रीकांचना यन्नम यांचे नाव अंतिम झाल्याची चर्चा होती. यन्नम यांची ही चौथी टर्म आहे. अडीच वर्षापूर्वी यन्नम यांना संधी देण्याचे ठरले होते. पण शोभा बनशेट्टी यांची वर्णी लागली. यन्नम यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले. पण अंबिका पाटील यांचे पती राजकुमार पाटील हे गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळावी अशी मागणी काही नगरसेवक करत होते.
देशमुख कोंडी कशी फोडणार ?- माजी मंत्री सुभाष देशमुख गटाच्या नगरसेवकांची गुरुवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत काही नगरसेवकांनी श्रीकांचना यन्नम यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा आग्रह धरला. उपमहापौरपद मनीषा हुच्चे यांना मिळावे यासाठी आग्रह धरण्यात आला. दुसरीकडे सुरेश पाटील आणि नागेश वल्याळ यांनी भाजपतील काही नगरसेवकांना हाताशी धरुन यन्नम यांचे नाव पुढे केले आहे. यन्नम यांना उमेदवारी न दिल्यास बंडखोरी होईल, अशी चर्चा घडवून आणली जात आहे. विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी यापूर्वीच विजयकुमार देशमुख यांच्यावर दबाव टाकला आहे. आता देशमुख ही कोंडी कशी फोडतात याकडे लक्ष असेल.
कोठेंनी महाआघाडीकडे मागितले सभागृह नेतेपद- महेश कोठे यांनी एकीकडे भाजपला सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे. दुसरीकडे महाआघाडीच्या नगरसेवकांना निरोप पाठविले आहेत. आपण महापालिकेत आघाडी करु. मी शिवसेना किंवा काँग्रेसचा उमेदवार निवडून आणतो. पण मला सभागृह नेतेपद द्या, असा निरोप काँग्रेसच्या नेत्यांना पाठविण्यात आला. पण काँग्रेसच्या नेत्यांनी कोठेंची ही मागणी स्वीकारण्यास नकार दिल्याचे एका नगरसेविकाच्या पतीने सांगितले.
सारखा सारखा चमत्कार होत नसतो : देशमुख- महापालिकेत भाजपचे ४९ नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपचाच महापौर होईल. महाआघाडी वगैरेचा काही फरक पडणार नाही. एकदा चमत्कार झाला म्हणून सारखा सारखा चमत्कार होत नसतो, असा टोला माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी लगावला.
महापौरपदाबाबत आम्ही नगरसेवकांची मते जाणून घेतोय. जिल्हा निरीक्षक मकरंद देशपांडे शुक्रवारी सोलापुरात आहेत. त्यांच्यासोबत संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर महापौर निवडीबाबत चर्चा होईल. - विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भाजप.