मोठ्या आर्थिक अडचणीत असलेला सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ प्रशासकीय मंडळाच्या काळात सावरत आहे. दूध संघ अडचणीत येण्यासाठीची कारणे शोधून कारवाया सुरू झाल्याने अनेकांची अडचण झाली आहे. एकामागून एक प्रकरणे बाहेर येऊ लागले व त्यात संघाचे अधिकारी- कर्मचारी गुंतले जाऊ लागले. यामुळे राजकीय दबाव वाढवून प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनाच हटविण्याचा आदेश सोमवारी विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी काढला. हा आदेश धडकताच दूध संघाचे हितचिंतक असलेल्या काही दूध संस्थांच्या चेअरमन यांनी दुग्धविकास मंत्र्यांकडे तक्रारी केल्या.
दूध संघ सावरला पाहिजे अशा विचाराच्या
काही राजकीय नेत्यांनीही पांढरे यांना हटविणे चुकीचे असल्याची भूमिका घेतली. विरवडे बु. येथील चंद्रभागा सहकारी संस्थेचे चेअरमन अनिल अवताडे, सांगोला तालुक्यातील कडलास येथील सिद्धनाथ दूध संस्थेचे चेअरमन मारुती लवटे, आलेगाव येथील राजमाता दूध संस्थेच्या चेअरमन मंगल अशोक लवटे व इतर ११ दूध संस्थांनी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे तक्रार करुन शेतकऱ्यांचा दूध संघ वाचला पाहिजे त्यासाठी श्रीनिवास पांढरे यांच्याकडेच अध्यक्षपद ठेवण्याची मागणी केली. याची दखल घेत सहनिबंधक बी. एन. जाधव यांनी विभागीय सहनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या आदेशास स्थगिती दिली.
----
वितरणची फाईल निघाली अन्
प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष का बदलले? असा प्रश्न दुग्धविकास मंत्री सुनील केदार व विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांना मोबाईलवर विचारला आहे. विरवडेच्या दीपक अवताडे यांनी. वितरणच्या एक कोटीचा घोटाळा निघाल्याने पांढरे यांना पदभार काढल्याचा आरोप अवताडे यांनी केला. चोऱ्या थांबल्या, येणे बाकी वसुलीच्या नोटिसा निघाल्याने पांढरे यांना काढले. पांढरे यांनाच ठेवा अन्यथा न्यायालयात जाऊ असा इशाराही दीपक आवताडे यांनी दिला होता.
---
लोकमतच्या वृत्ताची ही दखल
जिल्ह्यातून दूध संघाच्या प्रशासकीय मंडळात पांढरे यांना ठेवा असा दबाव शासन दरबारी वाढला. त्यात ‘लोकमत’ची बातमीही उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुनील केदार, माजी खासदार राजू शेट्टी यांना काहींनी पाठवली. मंत्री केदार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या
एका ज्येष्ठ नेत्याला फोन करुन विचारणा केली असता त्यांनी पांढरे यांचे काम चांगले असल्याचे सांगितले.