सोलापूर : पंढरपूर बस स्थानकाच्या आवारातच दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातातपंढरपूर डेपोच्या पंढरपूर-परळ या एसटीची काच फुटून वाहक जखमी झाला. परंतु, सुदैवाने दोन्ही एसटीतील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.
पंढरपूर बसस्थानकातून पंढरपूर-परळ एसटी क्रमांक एम एच १४/ के क्यू १२५८ ही परळ कडे जाण्यासाठी बाहेर निघाली असता. बाहेरून बसस्थानकात वेगात आलेली तुळजापूर-देवगड एसटी क्रमांक एम एच २०/ बी जे २९१८ या एसटीच्या वाहकाच्या निम्म्या बाजूने परळ गाडी घासत गेली. यामध्ये पंढरपूर-परळ एसटीचे समोरील काच फुटून तसेच समोरील भाग फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. परळ एसटीची धडक होताच वाहक यांच्या डाव्या हातामध्ये फुटलेल्या काचा घुसल्याने त्यांचा हात रक्तबंबाळ झाला. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर स्थानक प्रमुख पंकज तोंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघात झालेल्या एसटी बसची पाहणी केली. अपघातात जखमी झालेल्या वाहकाला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. परंतु दोन्ही एसटी बसमधील कोणत्याही प्रवाशाला काहीही न झाल्याने सर्व प्रवासी सुखरूप होते.
बसस्थानकातून बाहेर पडताना अथवा स्थानकात प्रवेश करताना चालक जर असे बेजबाबदारपणे वाहन चालवत असतील तर त्यांच्या एका चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटी चालकांनी संयम ठेवून वाहन चालवावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.