सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून येत्या गुरुवारी म्हणजेच १७ डिसेंबर रोजी ऑनलाइन ऑक्शन म्हणजेच लिलाव होणार आहे. यात एसटीचे विविध भंगाराचे साहित्य विक्रीस ठेवण्यात आले आहेत. सोलापूर विभागातून ७८ बसेस भंगारात काढण्यात आल्या असून, या बसेस लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. सोबतच विविध १३५ वस्तूंचा लिलाव होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रतिवर्षी विविध वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. महामंडळाकडून मार्च २०१९ मध्ये शेवटचा लिलाव झाला होता. त्यानंतर चालू वर्षाच्या मध्याला लिलाव होणे गरजेचे होते; पण कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्षाच्या शेवटी १७ डिसेंबर रोजी होत आहे. यामुळे एसटी प्रशासनाला कोट्यवधी रुपये यामधून मिळतील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर विभागातून जवळपास १३५ विविध लॉट ठेवण्यात आले आहेत़ सोबतच मागील वेळेच्या तुलनेत यंदा स्क्रॅप बसगाड्यांची संख्याही जास्त आहे. मागील वर्षी जवळपास ९५ गाड्या भंगारात काढण्यात आलेल्या होत्या; पण यंदा मात्र या ७८ गाड्या आहेत़ या प्रत्येक गाडीला दीड लाखांपेक्षा जास्तीची रक्कम येण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे.
या वस्तूंचा लिलाव होणार
- स्क्रॅप नायलॉन टायर ११००
- खराब रेडिअल टायर २५००
- खराब बॅटरी ८८० नग
- स्कॅप लोखंड २५ मे. टन
- स्क्रप अॅल्युमिनीअम १२ मे़ टन
- स्क्रॅप पाटे ५० मे. टन
- स्कॅप मिसलेनिएस अॅटो ४० मे. टन
- बसेस ७८ नग
- स्कॅप बस बॉडी १०८ नग