सोलापूर : कोरोनाची स्थिती हळूहळू कमी होत असताना एस.टी. वाहतूक सुरळीत होत आहे. सोलापूर विभागातील जवळपास ७० टक्के गाड्या या मार्गावर धावत आहेत; पण परराज्यांतील बहुतांशी मार्ग हे उद्यापपर्यंत बंदच आहे. त्यामुळे परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चटका बसत आहे.
सोलापूरच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्याला सोलापुरातील सोलापूर, अक्कलकोट, करमाळा या डेपोतून अफजलपूर, विजापूर, इंडी या मार्गावर गाड्या सोडण्यात येत होत्या. या गाड्यांना प्रवाशांचा तसा चांगला प्रतिसादही मिळत होता. एस.टी.च्या उत्पन्नात वाढ होत होती; पण सध्याला वरील मार्गांवरील बहुतांश गाड्या रद्द आहेत म्हणून इतर राज्यांना जाण्यासाठी प्रवाशांना दुचाकीवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे किंवा खासगी वाहनाने जावे लागत आहे. खासगी वाहनाने जाणे हे सध्याला न परवडणारे असल्यामुळे कर्नाटक राज्यात जाण्यासाठी दुचाकींची वर्दळ वाढलेली आहे.
----------------
- विभागात एकूण आगार - ९
- विभागातील एकूण बसेस - ७००
- विभागातील सुरू असलेल्या फेऱ्या - १३५०
- परराज्यांत जाणाऱ्या गाड्या - २०
पुणे- हैदराबादला जाण्यासाठी गर्दी
सोलापूरकरांचे पुणे आणि हैदराबादशी विशिष्ट नात आहे. सोलापुरातील बहुतांश तरुणवर्ग हा पुण्यात नोकरीसाठी, उदरनिर्वाहासाठी जात असतो. तसेच हैदराबादची आपुलकीचे सोलापूरकरांची नाते आहे. यामुळे पुणे आणि हैदराबाद मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
निर्बंधांमुळे प्रवाशांवर परिणाम
सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे विविध राज्यांनी अनेक निर्बंध लागू केले आहेत. सोलापूरच्या सीमेवर असणाऱ्या कर्नाटक राज्याने प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट असल्याशिवाय राज्यात प्रवेश करता येणार नाही, असा नियम घातला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्याच्या एस.टी.तून जाताना प्रवाशांना प्रथम आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट दाखवावा लागतो. त्यामुळे बहुतांश एस.टी. गाड्या राज्याच्या सीमेपर्यंत धावत आहेत. त्याचा फटका एस.टी.ला बसत आहे.
गाणगापूर, अफजलपूर मार्गावर फेऱ्या बंदच
कर्नाटक मार्गावरील अनेक गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. पण सध्याला कोरोनाचा निर्बंधांमुळे सोलापूर विभागातून गाणगापूर, अफजलपूर, विजापूर, शिंदी इंडी या मार्गावर क्वचितच गाड्या धावत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.