आप्पासाहेब पाटील
सोलापूर : प्रवाशांचा वेळ वाचून त्यांना अधिक वेगवान सेवा मिळावी, यासाठी एस. टी. महामंडळाने राज्यात अनेक मार्गांवर विना वाहक-विना थांबा बससेवा लवकरच सुरू करणार आहे़ या सेवेमुळे महामंडळाचा आर्थिक भार हलका होण्याबरोबरच कर्मचाºयांच्या कमतरतेचा विषयही निकाली निघणार आहे़ त्यामुळे नक्कीच एसटी महामंडळ ऊर्जितावस्थेत येणार यात मात्र शंका नसल्याचे मत राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
राज्यातील खेड्यापाड्यातून, गावागावांतून जाणारी लालपरी (गरीब रथ) आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापन दिन आज शनिवार १ जून २०१९ रोजी साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विभागीय नियंत्रक गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, प्रवाशांचा वेळ वाचून त्यांना अधिक वेगवान सेवा मिळावी यासाठी एस. टी. महामंडळाने राज्यात अनेक मार्गांवर विनावाहक-विनाथांबा बससेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी प्रवाशांना ज्या ठिकाणाहून बस सुटणार आहे तिथेच तिकीट घेता येणार असून, तिथून बस गेल्यानंतर पुढे ती कुठेही न थांबता थेट शेवटच्या स्थानकापर्यंत जाणार आहे़ काही मार्गांवर एक-दोन प्रमुख ठिकाणी बस थांबविल्या जाणार असून, तेथील प्रवाशांचे तिकीट वाहकच काढणार आहे़ या चालक कम वाहकांमुळे प्रवाशांना वेगवान सेवा देण्याबरोबरच कर्मचारी कमतरतेवर तोडगा निघणार आहे.
महामंडळाने सामाजिक बांधिलकी जपली...- एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत़
सोलापूर विभाग कात टाकतोय...- ७१ वा वर्धापन दिन साजरा करीत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने विविध स्तरावर लौकिकपूर्ण कामगिरी केली आहे़ सध्या विभागात पंढरपूर येथील चंद्रभागा स्टँडवर नव्याने बसस्थानक उभारणीचे काम सुरू आहे. सोलापूर बसस्थानकाचे संपूर्ण काँक्रिटीकरण केले, एमआयडीसी येथे १४ कोटी रुपये खर्चून नव्याने विभागीय कार्यशाळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ विभागात नव्याने साध्या गाड्यांसह शिवशाही बसदेखील दाखल झाल्याची माहितीही रमाकांत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आषाढीपूर्वी १०० बस - सोलापूर विभागात आतापर्यंत साध्या गाड्यांसह शिवशाही बस दाखल झाल्या आहेत. त्या विविध महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहेत़ पंढरपूर येथे होणारी आषाढी वारी काही दिवसांवर आली आहे़ या आषाढी वारीत वारकºयांना तत्पर, जलद व सुरक्षित सेवा पुरविण्यावर भर देण्यात येणार असून, आषाढीपूर्वी १०० बस विभागात दाखल होतील, अशीही माहिती गायकवाड यांनी दिली.
प्रवासी वाढले..- राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या एसटीसमोर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा वाढली़ या स्पर्धेच्या युगात खासगी प्रवासी गाड्यांनी प्रवाशांना विविध सेवासुविधा पुरविण्यावर भर देऊन प्रवासी खेचण्याचा प्रयत्न केला मात्र याला तोंड देत राज्य परिवहन महामंडळाने खासगीपेक्षा अधिक सेवासुविधा प्रवाशांना देण्यावर भर दिला़ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी प्रवाशांची संख्या अधिक वेगाने वाढली़