सोलापूर : दिवाळीनिमित्त परगावावरून सोलापूरला येणाऱ्या तसेच सोलापूर वरून परगावी जाणाऱ्या प्रवाश्यांची मोठी गर्दी असते. या काळात प्रवासी एसटी, रेल्वे तसेच खासगी बसेसने मोठ्या संख्येने प्रवास करतात. अशा परिस्थितीत काही खासगी बसेस ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा अतिरिक्त भाडे आकारण्याची शक्यता लक्षात घेता, परिवहन आयुक्त कार्यालयाने याबाबत कारवाईचे निर्देश जरी केले आहेत. त्यानुसार, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांचेकडून आशा अतिरिक्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या आणि ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायूवेग पथके यासंबंधीची तपासणी एसटी स्टँड, पुना नाका आणि बाळे या ठिकाणी करीत आहेत आणि दोषी बसेसवर आणि बस चालकांवर कारवाई करत आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की जर खासगी बस चालकांकडून अतिरिक्त प्रवासी वाहतूक अथवा अतिरिक्त भाडे आकारणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांना संपर्क करावा असे आवाहन केले आहे.