एल. डी. वाघमोडे
माळशिरस : तालुक्यातील सुपीक जमीन व चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून ख्याती होती. मात्र, सध्या तालुक्यात वीज चोरी, पाणीचोरी, बँकेचे कर्ज थकविल्याचे गुन्हे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस बळिराजा अडकत चालला आहे. यामध्ये बळिराजाला अभय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
या बाबतीत शेतीमालाला उपलब्ध होणाऱ्या खात्रीच्या बाजारपेठ, शेतीपूरक व्यवसायांना विशेष प्राधान्य, वीज व पाणी या बाबतीत योग्य पैशाची आकारणी अशा महत्त्वाच्या गोष्टींकडेे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
कृषी व्यवसाय तालुक्यातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, या व्यवसायावर नैसर्गिक आघातांबरोबर राजकीय निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून पक्ष आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृष्णा भीमा स्थिरीकरण, नीरा देवधर, समांतर पाईपलाईन, औद्योगिक वसाहत व रेल्वे मार्ग अशा महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मृगजळावर कृषी व्यवसाय किती दिवस तग धरणार? घाम गाळूनही चोरीचा कलंक आणखी किती दिवस कपाळी मिरवावा लागणार? असाही सूर बळिराजामधून विचारला जाऊ लागला आहे.
----
कृषी उत्पन्नांची अनिश्चितता, नैसर्गिक संकटांचा आघात, बेभरवशाची कृषी धोरणे, शेतीशी निगडित क्षेत्रातील अधिकारी व लोकप्रतिनिधींची मनमानी व ध्येय धोरणे अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी जाऊन दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे. बळिराजाच्या माथी लागत असलेला कलंक कृषी व्यवसायाची धोक्याची घंटा आहे हे ओळखण्याची गरज आहे.
- बाजीराव काटकर, सरपंच धर्मपुरी