सोलापूर - सोलापूर महानगपालिका स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे हा निर्णय झाल्याची माहिती पुढे येत आहे.सोलापूर महापालिका स्थायी सभापती निवडीत गुरुवारी भाजपाच्या गटबाजीचा पुन्हा दणका बसला. प्रदेश भाजपातर्फे राजश्री कणके यांचे नाव आलेले असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे सहा सदस्यीय शेवटच्या क्षणापर्यंत न आल्याने भाजपाची उमेदवारी दाखल होण्याची गोची झाली. होती शेवटचा एक मिनिट उरलेला असताना महापौर शोभा बनशेट्टी, संजय कोळी व भाजपाचे इतर पदाधिकारी अर्ज भरण्यासाठी नगरसचिव कार्यालयात आले पण वेळ संपलेली आहे असे सांगून शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण व इतर पदाधिका-यांनी त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखले होते.
संजय कोळी अजून वेळ आहे असे म्हणत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यास प्रखर आक्षेप नगरसचिवांपर्यंत जाण्यास रोखले़ सुमारे पाच मिनिटे नगरसचिव कार्यालयात शिवसेना-भाजप पदाधिका-यांत हमरीतुमरी झाली. शेवटी नाईलास्तव महापौर शोभा बनशेट्टी, उमेदवार राजश्री कणके, संजय कोळी व इतर कार्यकर्ते बाहेर पडले. वेळ संपली तेव्हा स्थायी सभापती पदासाठी एकमेव उमेदवार गणेश वानकर यांचा एकच अर्ज आला आहे. त्यामुळे भाजपा गटबाजीत स्थायी सभापतीपदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या गोंधळानंतर भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी व इतर पदाधिकारी यांची फोनाफोनी सुरू होती़ या गोंधळाबाबत त्यांची काय भूमिका असणार याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.
भाजपामधील गोंधळाचा तिस-याला फायदा गोंधळानंतर नगरसचिव प्रविण दंतकाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला मात्र त्यावर अनुमोदक म्हणून कोणाचीच सही नाही़ त्यामुळे छाननीत या अर्जाचे भवितव्य ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सहकारमंत्री गटाचे नागेश वल्याळ, संतोष भोसले व इतर दोन सदस्य दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगरसचिव कार्यालयात आले होते मात्र त्याचवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज एका कार्यकर्त्यांने पळवून नेला त्यामुळे संतापून ते चौघे नगरसेवक निघून गेले़ भाजपाचे उमेदवार कणके अनुमोदकच्या प्रतिक्षेतच राहिल्या दरम्यान, विरोधी गटाचे सदस्य नगरसचिव कार्यालयात आले पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपामधील गोंधळाचा तिस-याला फायदा झाल्याचे स्पष्ट झाले.