मागील ८ ते १० वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जिल्ह्यासह सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची पेरणी करून चांगले उत्पादन घेतले आहे. दरम्यानच्या काळात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, बदलते हवामान यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. पर॔ंतु खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३३३ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी केली आहे.
सध्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली पांढरी व तांबडी तूर बाजारात विक्रीस आणली असता किमान ४ हजार ५०० ते ५ हजार पर्यंतचा भाव मिळत आहे. याशिवाय तुरीच्या काढणी, मळणीसह खासगी व्यापाऱ्यांकडून घसारा, हमाली व इतर खर्चामुळे शेतकऱ्यांना तूर विक्री करणे परवडणारे नाही. जर शासनाने हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करून प्रतिक्विंटल ६ हजार रुपये भावाने तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.