सांगोला शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गोरगरीब रुग्णांसाठी सांगोल्यात कोविड हॉस्पिटल सुरू करावे, अशी सर्वपक्षीय नेतेमंडळीसह जनतेची मागणी होती. या मागणीची दखल घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुमारे १ कोटी निधीतून सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे व प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे कोविड हॉस्पिटल चालू करण्यासाठी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मेडशिंगी प्राथमिक केंद्रासाठी ४० लाख व सांगोला ग्रामीण रुग्णालयासाठी ४० लाख विविध आरोग्य साहित्यासाठी मंजूर झाले आहेत.
येत्या दोन ते तीन दिवसांत ऑक्सिजन लाइन टाकण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर १ जूनला हे हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांच्या सेवेकरिता दाखल होणार आहे. लसीकरण, कोरोना चाचणीसंदर्भात प्रशासनाने योग्य नियोजन करावे, नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशाही सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी केल्या.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमनी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अशोक मुलगीर, डॉ. शिवराज भोसले, डॉ. पीयूष साळुंखे, डॉ. मकरंद येलपले, डॉ. गावडे, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ उपस्थित होते.