महाविद्यालयातील ग्रंथपाल महत्त्वाचे पद गेल्या अनेक वर्षांपासून चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया सुरू करण्या संदर्भात शासन निर्णय काढून त्यात ग्रंथपाल पदांच्या १०० टक्के पदभरतीस मान्यता दिली. मात्र, त्यानंतर तांत्रिक अडचणीत भरती प्रक्रिया रेंगाळली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र, राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला व परत राज्य सरकारने भरती प्रक्रियेवर निर्बंध आणले. मार्च २०२१ मध्ये या निर्बंधात शिथिलता आणत महाविद्यालयातील प्राचार्य पदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली. मात्र महाविद्यालयातील ग्रंथपाल पद हे प्राचार्य पदाप्रमाणे एकाकी पद असून तितकेच महत्त्वाचे पद आहे. तरीही शासनाने ग्रंथपाल पदाच्या भरतीवर लावलेले निर्बंध उठविले नाही.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने भरती प्रक्रियेवर निर्बंध लादले. त्यापूर्वी राज्यातील ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भताने यांनी केली आहे.