सोलापूर : जिल्ह्यात २८ हजार कुणबीच्या नोंदी सापडल्या असून, या सर्व नोंदींचे स्कॅनिंग सुरू आहे. राज्य शासनाने विशेष वेबसाइटची निर्मिती केली असून, या साइटवर जिल्हा प्रशासन मोडी लिपीतील कुणबीच्या नोंदी स्कॅन करून अपलोड करत आहे.
तसेच सर्वाधिक कुणबीच्या नोंदी मोडी लिपीत असून, या नोंदींचा अभ्यास करण्यासाठी प्रमाणपत्रधारक मोडी लिपी अभ्यासकांची मदत घेतली जात आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील पन्नास लाखाहून अधिक प्रशासकीय कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २८ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सर्वाधिक नोंदी जन्म मृत्यू दाखल्यांशी संबंधित आहेत. जिल्हा प्रशासनाने नोंदी तपासण्यासाठी तेरा मोडी लिपी अभ्यासकांची यादी तयार केली आहे. यात आणखी सहा अभ्यासकांच्या नावांचा समावेश करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना विचारले असता त्यांनी सकल मराठा समाजाने सुचवलेली सहा नावे यादीत समावेश करू. ज्यांच्याकडे मोडी लिपी अभ्यासकाचे प्रमाणपत्र आहे, अशांना मोडी लिपीतील कुणबीच्या नोंदी तपासण्याचे काम देण्यात येणार आहे.