बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ८८१ पेन्शन धारक वृद्ध कलावंत आहेत. या कलावंतांना शासनाकडून प्रतिमहिना विशिष्ट मानधन मिळते. गेल्या तीन महिन्यांपासून कलावंतांच्या खात्यात मानधन जमा होईना. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर कलावंतांची उपेक्षा सुरू आहे. वारंवार शासकीय कार्यालयात चकरा मारल्यानंतर देखील त्यांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळेना. त्यामुळे शासकीय पातळीवर त्यांची अवहेलना सुरू असल्याची भावना वृद्ध कलावंतांनीच व्यक्त केली आहे.
कलेच्या प्रतिभेवर समाज जनजागृती, समाज प्रबोधन आणि समाज मनोरंजन करणाऱ्या प्रतिभावान कलावंतांना शासनाकडून पेन्शन स्वरूपात मानधन दिली जाते. कलावंत त्यांच्या उतारवयात स्वाभिमानाने जीवन जगावेत, त्याकरता ही मानधन असते. नाटक, पथनाट्य, तमाशा, शाहिरी, भजन-कीर्तन, खडीगंमत, दशावतार, झाडीपट्टी, गायन-वादन, चित्रपट, नृत्य तसेच लोककला या कलाक्षेत्रातील वृद्ध कलावंतांना शासनाकडून मदतपर मानधन दिली जाते.
सदर मानधन वेळेवर मिळत नाही. कधी दोन तर कधी तीन, तर कधी चार -चार महिन्यानंतर मानधन मिळते, अशी तक्रार कलावंतांनी केली. याबाबत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रतिमहिन्यात पाच तारखेच्या आत कलावंतांच्या खात्यावर मानधन जमा करा, अशी मागणी कलावंतांनी शासनाकडे केली आहे.
वृद्ध कलावंतांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. कलावंतांना त्यांच्या औषध-पाणी करता देखील मानधन पुरत नाही. मानधनात वाढ मिळावी. याकरिता अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु शासनाकडून प्रतिसाद मिळेना.- शाहीर बापू पटेलअध्यक्ष- सोलापूर जिल्हा लोक कलावंत संघटना
वेळेवर मानधन मिळत नसल्याने कलावंतांची कौटुंबिक पातळीवर अडचण होते. आर्थिक विवंचनेत सापडतात. कलावंतांना एक ते पाच तारखेच मानधन मिळावे. याकरिता आम्ही संस्कृती मंत्री अमित देशमुख यांना निवेदन दिले आहे.- सुरेश बेगमपूरसचिव-सोलापूर जिल्हा लोक कलावंत संघटना
कलावंतांच्या मागण्या मान्य होईनात. मागील वर्षभरापासून नवीन समिती गठित नाही. त्यामुळे कलावंतांच्या मागण्यांना न्याय मिळेना. पालकमंत्र्यांनी नवीन समिती गठित करावी.- यल्लप्पा तेलीखजिनदार-सोलापूर जिल्हा लोक कलावंत संघटना