सोलापूर : कोरोनामुळे येणाऱ्या अडचणींमुळे राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात येत नव्हत्या. यंदा मात्र या स्पर्धा १८ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात या स्पर्धा होतील.
गतवर्षी कोरोनामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्याचा फटका राज्य नाट्य स्पर्धांनाही बसला होता. अनेक रंगकर्मी, संस्था, संघटना यांनी या स्पर्धा लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी केली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगानेच कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यात नेमून दिलेल्या केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अद्यापही घेण्यात आलेला नाही. या कार्यक्रमालाही कोरोनाचाच अडसर होता. मात्र, आता स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे या स्पर्धा पार पडल्यानंतर लवकरच बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांगण्यात आले.
राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदणीची अंतिम मुदत बुधवारी संपली. दोन ते तीन दिवसांनंतर स्पर्धेत किती संघ भाग घेतील हे स्पष्ट होईल. त्यानंतर नियोजन करून हुतात्मा स्मृती मंदिर येथे स्पर्धा होतील.
- प्रा. ममता बोल्ली, समन्वयिका, राज्य नाट्य स्पर्धा