सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी कोंडी येथे कारमधून हातभट्टीची दारू जप्त केली. तसेच १४ मार्च रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्टीच्या ठिकाणांवर संयुक्तपणे छापे टाकून १२ हजार ६५० लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करून जागीच नष्ट केले आहे. या प्रकरणी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर - पुणे महामार्गावरील कोंडी येथे सापळा रचून कारमधील रबरी ट्यूबमधून १०४० लिटर हातभट्टीची दारू नेताना पकडले. यावेळी वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. यात वाहनासह ७ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक तथा निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले यांनी पार पाडली.
एका अन्य कारवाईत निरीक्षक संभाजी फडतरे यांच्या पथकाने सोलापूर - अक्कलकोट मार्गावरील मल्लिकार्जुन नगर परिसरात सुरेश कोटू चव्हाण (वय २३ वर्षे, रा. मुळेगाव तांडा) याला दुचाकीवरून तीन रबरी ट्यूबमधून २४० लिटर हातभट्टीच्या दारूची वाहतूक करताना अटक केली. यात ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय १४ मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या संयुक्त पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील गणपत तांडा, सेवा तांडा व गुरप्पा तांड्यांवर धाडी टाकून ५ गुन्हे नोंदवून हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे १२ हजार ६५० लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. या कारवाईत विश्वनाथ फुलचंद पवार (वय ३९, रा. वरळेगाव), सुरेश हरिबा पवार (वय ३८, रा. बक्षीहिप्परगा) व आशा सुनील चव्हाण (वय ३३, रा. गणपत तांडा) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.