- बाळासाहेब बोचरेमुंबई : आषाढी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी दिली. त्यासोबत २० ऐवजी ४० जणांना बसने जाण्यास परवानगी दिली. मात्र वाखरीपासून चालण्यास केवळ दोन वारकऱ्यांना परवानगी देताना लावलेल्या निकषांवरून वारकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे वातावरण असून आता आपणाला जे हवे ते त्या दिवशी दशमीलाच करायचे, असा ठाम निर्णय विविध पालखी व्यवस्थापनाने घेतला असल्याचे एका विश्वस्तांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
गेल्यावर्षी प्रत्येक पालखीसोबत २० जणांना परवानगी दिली होती. यंदा ती दुप्पट करण्यात आली असली तरी त्यापैकी ३८ जणांना बसमध्येच बसण्याची अट घातली आहे. दोघांनी देवाच्या पादुका कशा घेऊन जाऊ शकतात? हे शासनानेच पालखी व्यवस्थापनाला पटवून सांगावे. देव जाताना मानकरी, टाळकरी, वादक असा लवाजमा असतो. तो नसेल तर मग पायी वारी तरी कशासाठी करायची? असा सवाल त्यांनी केला. आता प्रशासनाकडे अर्ज विनंती करण्यापेक्षा जे करायचे ते परंपरेला साजेसेच करायचे. मग प्रशासनाला काय कारवाई करायची ते करु देत असा निर्णय घेतला गेला आहे. प्रसंगी पादुका प्रशासनाकडे सोपवून ४० जणांनी बसनेच पंढरपूरला जाण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
वाखरीला पालख्या पोहोचल्यानंतर तिथून पुढील वाटचाल करताना प्रत्येक पालखी व्यवस्थापन त्यांच्या परंपरेप्रमाणेच सोहळा पुढे नेण्याचा आग्रह धरतील. सर्व ४० वारकरी हे मानकरी असतात. सेवेसाठी त्यांना देवासोबत चालणे गरजेचे असते. प्रशासनाने विरोध केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो. याचा विचार करुन अगोदरच त्याचे नियोजन करावे. २० लोकांना चालण्याची परवानगी असेल तर तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त कशाला? दोघांनाच चालण्याची परवानगी असेल तर मग बस कशाला? मग वारकऱ्यांनी वारीला तरी का यावे? असे सवाल करुन ४०० वारकऱ्यांना पायी वारी नीट करु द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
हजारो भाविक पांडुरंग चरणी लीन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षीही प्रशासनाने आषाढी यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मानाच्या दहा पालख्या व त्यामध्ये मोजक्याच भाविकांना आषाढी यात्रा एकादशीदिवशी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपुरात कडक संचारबंदी लागू केली आहे.