सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २ जानेवारीपासून विद्यापीठात राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी सहा वाजता उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांत कुमार वनंजे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य ब्रँड अँबेसिडर (सदिच्छा दूत) प्रिया पाटील, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. राजेश गादेवार तसेच कुलसचिव योगिनी घारे आदी उपस्थित राहतील. ५ जानेवारी पर्यंत चालणारा महोत्सव कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होईल.उत्कर्ष राज्यस्तरीय महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण गुरुवार, ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सोलापूरचे जागतिक कीर्तीचे सुंदरी वादक पंडित भीमण्णा जाधव यांच्या हस्ते होईल. राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास दुसऱ्यांदा उत्कर्ष महोत्सवाच्या यजमानपदाची संधी दिली आहे. यापूर्वी २०१० मध्ये सोलापूर विद्यापीठात हा महोत्सव झाला.