सोलापूर : अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बार्शी-लातूर या महामार्गावरील बार्शी तालुक्यातील पांगरी येथील बस स्थानक चौकात शेतकरी रस्त्यावर उतरलेले होते. त्यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा ताफा त्या मार्गावरून पुढे जाणार होता, परंतु आंदोलनामुळे हा ताफा अडकून पडला होता. त्यामुळे मंत्री तानाजी सावंत गाडीखाली उतरून आंदोलनामध्ये आले व त्या ठिकाणी पंधरा दिवसाच्या आत अतिवृष्टीतून वगळलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल असे आश्वासन दिल्यानंतरच शेतकरी संघटनेने आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
हे आंदोलन तात्पुरते स्थगित करून पंधरा दिवसाच्या आत मागण्यांची पूर्तता न झाल्यास संबंधित मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा शंकर गायकवाड यांनी यावेळी दिला. धनंजय तौर, सुहास देशमुख, सुनील गाढवे, सुरज पोकळे, भगवान खबाले, अनिल शिंदे, बाळासाहेब जगताप, बाबासाहेब जाधवर, डॉ.अरुण नारकर, रामभाऊ देशमुख, नानाप्पा मुंढे, सागर गोडसे, दादा गोडसे, बाबू काझी, गणेश काळे, किरण मुळे, शहाजहान बागवान, सौरभ यादव, बालाजी यादव, संतोष चव्हाण, बाबा जाधव, औदुंबर पाटील, शिवाजी गोडसे, सुनील खवले आदींसह हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. सुमारे एक तास हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन मंत्री तानाजी सावंत व बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी स्वीकारले तर या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता.