सांगोला : टेंभू व म्हैसाळचे पाणी बुद्धेहाळ तलाव व माण कोरडा नदीत सोडणे संदर्भात सांगोला तालुक्यातील दोन आमदार मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, ही जनतेची निव्वळ फसवणूक असून, येणारी विधानसभा निवडणूक समोर ठेवून केलेली ही राजकीय स्टंटबाजी आहे, असा आरोप माजी आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे. युती सरकारने १९९५-९६ साली दुष्काळी भागातील सर्व आमदारांच्या तीव्र मागणीनुसार टेंभू व म्हैसाळ या योजना तातडीने मंजूर केल्या. एवढेच नव्हे तर कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती करुन, मोठा निधी उपलब्ध केला व तातडीने सर्व कामे चालू केली. दुर्दैवाने १९९९ नंतर या कामांची गती गोगलगायप्रमाणे संथ सुरु झाली. त्यामुळे सांगोला तालुक्याचा कायापालट करणारी ही योजना गेली १५ वर्षे पूर्ण होऊ शकली नाही. टेंभूचे पाणी आटपाडी तालुक्यात येऊन ४ महिने होत आहेत, तरीही सांगोला तालुका वंचितच आहे. करगणीच्या ओढ्यातून ३ महिन्यांपूर्वीच हे पाणी बुद्धेहाळच्या तलावात सोडणे आवश्यक होते, परंतु आमच्या फार मोठ्या प्रयत्नाने हे पाणी आले, असा आभास निर्माण करण्यासाठी बुद्धेहाळ कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले़ आता हा स्टंटबाजीचा देखावा निर्माण करुन दोन आमदार उपोषण करीत आहेत. वास्तविक आटपाडी तालुक्याला पाणी सोडण्याच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगोला तालुक्याला पाणी देण्याचे आदेश अधिकार्यांना दिले होते. पाणी सोडण्यास परवानगी द्यावी, असा सांगली कार्यालयाचा अहवाल कृष्णा खोरेचे अधिकारी उपासे यांच्याकडे सादरही झालेला आहे. पाटील यांनी म्हटले आहे
. ----------
मुख्यमंत्र्यांना भेटणार पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरिता सोमवार, २ जून रोजी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ भेटणार आहे. गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्री दिल्लीत असल्याने भेट होऊ शकली नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.