सोलापूर : वडार समाजाचा कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये समावेश करुन एक देश-एक प्रवर्ग हा न्याय देत एस. सी. - एस. टी. प्रवर्गाचेच आरक्षण द्यावे, समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्यावे या मुख्य मागण्यांसह समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने सोमवार १७ डिसेंबर रोजी सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा आयोजित केला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वडार समाजाच्या या महामेळाव्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सहकारमंत्री सुभाष देशमुख व सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख असे राज्याचे अर्धा डझन मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. मंगळवारी हॉटेल ऐश्वर्या येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पार्क स्टेडियममध्ये होणाºया या मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यभरातून दीड लाख वडार बांधव उपस्थित राहणार आहेत. आपले प्रश्न शासनाकर्त्याच्या समोर मांडून सोडवणूक करण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. अत्यंत कष्टाळू असलेल्या वडार समाजाची अवस्था अत्यंत बिकट आहे. आजही दगड फोडण्याचे काम समाजबांधवांना करावे लागते. खडी व्यवसायात उतरलेल्या समाजबांधवांना शासनाच्या जाचक अटींमुळे उद्योग सोडावा लागतो आहे.
स्वातंत्र्यांची ७० वर्षे झाली तरी ७० ते ८० लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील वडार समाजाचा वनवास संपलेला नाही. किंबहुना त्यांच्यापर्यंत स्वातंत्र्यही पूर्णपणे पोहोचलेले नाही. म्हणून आता हा वडार समाज थोडाफार जागा होत असून ह्यमी वडार महाराष्ट्राच्या रुपाने संघटित होऊन शासन दरबारी प्रश्न मांडतो आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात समाजाचा महामेळावा आम्ही घेत आहोत. समाजाचे प्रश्न शासनाच्या पुढ्यात मांडण्यासाठीच हा महामेळावा असल्याचेही त्यांनी सांगितले़