सोलापूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाला असून, बालकांच्या नियमित लसीकरणासाठी वापरण्यात येणारी २ सीसी सिरिंज वापरण्यात येत असल्याने लसीचे वेस्टेज वाढले आहे.
साेलापूर जिल्ह्यासाठी लसीकरण करण्यासाठी एक लाख डोस आले आहेत. मंगळवारी लसीकरणासाठी हे डोस वितरित करण्यात आले. पण, डॉक्टरांकडून सिरिंज संपल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे बालकांच्या नियमित लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ४० हजार २ सीसी सिरिंज लसीकरण केंद्रावर वितरित करण्यात आल्या. लसीकरणाच्या एका कुपीत १० डोस असतात. एडी सिरिंजमुळे लसीकरण केंद्रावरील परिचारिका एका कुपीत ११ ते १२ डोस देतात. पण, आता २ सीसी सिरिंज देण्यात आल्याने वेस्टेज वाढले आहे. ही सिरिंज एडी सिरिंजच्या मानाने मोठी असते. प्रत्येक सिरिंजमध्ये १ ते दीड मिली लस वेस्टेज जात असल्याच्या तक्रारी डॉक्टरांनी केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तातडीने एक लाख सिरिंज खाजगी वितरकांकडून एडी सिरिंज खरेदीचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.
काय आहे एडी सिरिंजचे वैशिष्ट्ये
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनामार्फत एडी सिरिंजचा पुरवठा केला जात आहे. कुपीतून ५ मिली द्रावण ओढल्यावर ही सिरींज ॲटो लॉक होते. त्यामुळे एका कुपीत ११ ते १२ डोस होतात. एकदा डोस दिल्यानंतर ही सिरिंज पुन्हा वापरता येत नाही. एका डोसनंतर ही सिरिंज नष्ट करावी लागते.
२ सीसी सिरिंज कशी असते
लहान मुलांच्या नियमित लसीकरणासाठी आतापर्यंत २ सीसी या सिरिंजचा वापर केला जात आहे. ही सिरिंज जाड असते. यामध्ये १ ते दीड मिली द्रावण वाया जाते. त्यामुळे एका कुपीत १० डोस होत आहेत. डिस्पोजल एडी सिरिंजचा पुरवठा करावा, अशी लसीकरण डॉक्टरांकडून मागणी वाढली आहे.
केंद्र शासनाकडून तुटवडा
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाकडूनच एडी सिरिंजचा पुरवठा होत आहे. एका कुपीत १० डोसचे गणित ग्राह्य धरून तितक्या सिरिंज पुरविण्यात आल्या. पण बऱ्याच ठिकाणी ११ ते १२ डोस झाल्याने सिरींजचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन दिवसांत या सिरिंज पुरविण्यात येतील, अशी माहिती पुणे आरोग्य सेवाचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्याचे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी सांगितले.