लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : स्टेशन रोड-राऊत चाळ परिसर सध्या हिरव्या गार झाडांनी, सुगंधी पानाफुलांनी फुलला आहे. ही किमया साधली आहे. बार्शीतल्या मॉर्निंग ग्रुपने. मागील पाच वर्षांपूर्वी पाच हजार झाडे लावली. ती वाढविली. हा परिसर आता बार्शी नव्हे महाबळेश्वरचाच भास होताेय.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी नगरपालिकेचे पक्षनेते विजय राऊत व मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी गेल्या पाच वर्षांपासून राऊत चाळ व परिसरातील दत्तनगर, नाळे प्लॉट, भोसले चौक, संभाजीनगर, विठ्ठलनगर, रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे पाच हजार रोपांची लागवड केली. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
मॉर्निंग ग्रुपचे २५ सदस्य गेल्या वर्षांपासून दररोज सकाळी व्यायामासाठी सकाळी घराबाहेर पडतात. यापैकी जो कोणी गैरहजर असेल तर त्याला १५० रुपये दंड आकारण्यात आला. त्यामागे आळस करून कोणी व्यायाम चुकवू नये, अशी भूमिका अध्यक्ष विजय राऊत यांची होती. त्यातून अंदाजे अडीच लाख रुपये जमा झाले. या रकमेचे काय करायचे? असा प्रश्न उपस्थित झाला. आमदार राऊत यांनी वृक्षलागवड करण्याची सूचना केली. विजय राऊत यांनी त्याला मूर्त रूप दिले. अध्यक्ष नाना राऊत हे स्वतः च्या टँकरने सर्व झाडांना मोफत पाणी देतात.
याकामी डॉ. हरीश कुलकर्णी, नंदकुमार मुळे, महेश करळे, सचिन उकिरडे, समाधान पाटील, सतीश दळवी, सचिन मडके, दीपक मुंढे, अनिल कोरेकर, सभापती संदेश काकडे, डॉ. नितीन थोरबोले, अप्पा करळे, ऋषी मुलगे, शीतल नाळे, पिंटू नवगिरे, प्रवीण गायकवाड, प्रशांत खराडे, सारूख मेजर, शिंदे, संजय चौधरी, संजय धारूरकर त्या झाडांची जपणूक करताहेत.
---
पुनर्रोपण वडाचे झाड बहरले
ग्रुपच्या वतीने तीन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामात अडथळादायक ठरलेल्या वडाच्या झाडाचे जेसीबी मशीनच्या साहाय्याने पुनर्रोपण करण्यात आले होते. ते झाड आता डेरेदार झाले असून, त्याची दाट सावली मिळते आहे.
---
वड, पिंपळ, सिसव, आंबा, करंज
फुलवलेल्या झाडांमध्ये गुलमोहर, वड, पिंपळ, काशीद, सिसव, चिंच, कडूलिंब, करंज, आंबा, जांभूळ आदी झाडे अतिशय डौलदार आली आहेत. गेल्या चार दिवसांपासून या भागात पाऊस पडत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो महाबळेश्वरमधील नसून तो बार्शीतील आहे, अशी त्याची टॅगलाइन होती.
--
फोटो : १७ बार्शी १, २,३