सोलापूर : येथील सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद देण्यास अडसर ठरलेल्या महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रतिकात्मक पुतळा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यासमोरच्या परिसरात जाळण्यात आला.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातून एकमेव काँग्रेसच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद मिळाले नाही. मागील तीन वेळेपासून आमदार म्हणून काम करताना प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्ष वाढीबरोबरच सोलापूरच्या विकासकामात मोलाची साथ दिली आहे. अशा कर्तव्यदक्ष महिला आमदाराला डावलून जातीचे राजकारण करीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी अन्य आमदारांना मंत्रीपद बहाल केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केला़ मल्लिकार्जुन खर्गे हटावा...महाराष्ट्र बचाव...प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे..राहुल गांधी जिंदाबाद़..अशा एकापेक्षा एक घोषणेने पार्क चौक दणाणून गेला होता.
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामुळेच आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद मिळाले नसल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी केला आहे़ यावेळी नगरसेवक विनोद भोसले, सुभाष वाघमारे, तिरूपती परकीपंडला यांच्यासह अन्य युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.