शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आता प्रत्यक्षात उतरणार आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी पुणे येथील मूर्तिकार महेंद्र थोपटे यांची भेट घेतली. त्यांना मूर्ती निर्मितीसाठी दोन लाख रुपये ॲडव्हान्स दिला. मूर्तीसाठी एकूण ६१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी शहरातील सर्व राजकीय, सामाजिक संघटना, उत्सव मंडळांना सोबत घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी पक्षनेते अजित जगताप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सोमनाथ माळी, नगरसेवक प्रवीण खवतोडे, भाजपचे शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, नगरसेवक राहुल सावंजी, दीपक माने, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष माउली कोंडुभैरी, स्वाभिमानीचे अध्यक्ष हर्षद डोरले, संभाजी घुले, किशोर दत्तू, सचिन साळुंके, सिध्देश्वर मेटकरी उपस्थित होते.
---
...असा असेल पुतळानिहाय खर्च
प्रत्येक पुतळ्यासाठी प्रतिफूट १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १५ फूट उंचीचा राहील. त्यासाठी ३१ लाख रुपये खर्च येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रत्येकी १० फूट उंचीचा राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकी दहा लाख खर्च होईल. एकूण चार पुतळ्यांसाठी ६१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
---