टेंभुर्णी: जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले जावेत, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी उजनी (टें) येथील जि. प. शाळेत मुक्काम ठोकून ग्रामस्थांशी संवाद साधला व लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन देऊन जनतेला दिलासा दिला. दोन तास साधला संवाद जिल्हाधिकारी गेडाम यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजता उजनी (टें.) गावात आगमन झाले. प्रांताधिकारी मनीषा कुंभार, तहसीलदार रमेश शेंडगे त्यांच्यासमवेत होते. महसूल, कृषी, विद्युत, खात्याचे अधिकारी अगोदर हजर होते. सव्वानऊ वाजता गेडाम यांनी उजनी (टें) ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश पाटील यांनी उजनी या विस्थापित गावाबद्दल माहिती देऊन येथील जनतेच्या मूलभूत प्रश्नांबद्दल वाचा फोडली. यानंतर जिल्हाधिकार्यांनी लोकांना प्रश्न मांडण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तास ही चर्चा सुरु होती. यातून त्यांनी विविध स्तरावरील माहिती जाणून घेतली. गावातील मुले शिक्षणासाठी कोठे जातात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी परवडते का?, गावात किती ट्रॅक्टर आहेत, सिंचनाची सोय काय आहे, ठिबक सिंचन केले आहे का?, गावात दारुभट्ट्या आहेत काय? असे प्रश्न विचारुन गेडाम यांनी ग्रामस्थांना बोलते केले. ग्रामस्थांनी केल्या मागण्या उजनी धरणाच्या बांधकामासाठी लागणारा दगड काढण्यासाठी शासनाने संपादित केलेल्या जमिनी त्याच शेतकर्यांना परत कराव्यात, दारिद्र्यरेषेखालील लोकांचा सर्व्हे २००७ साली झाला आहे; परंतु अद्याप यादीच तयार झाली नाही. ती त्वरित तयार करावी, १५ वर्षांपूर्वी दिलेले रेशनकार्ड सध्या जीर्ण झाली आहेत ती नवीन देण्यात यावीत, १९९४ साली दिलेल्या मतदान कार्डावरील चेहरे आता ओळखता येत नाहीत ती नव्याने देण्यात यावीत, उजनी धरणाच्या निर्मितीसाठी उजनी (टें) गाव पूर्णपणे विस्थापित झाले आहे. येथील लोकांचा त्याग मोठा आहे याच धरणातून सोलापूर येथील एन. टी. पी. सी. मध्ये येथील बेरोजगार तरुणांना संधी देण्यात यावी, या मागण्यांवर जिल्हाधिकार्यांनी विचार करुन यशस्वी मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी चर्चेद्वारे केली.
------------------------
महिलांना सामावून घ्या
बैठकीला महिलांची उपस्थिती नगण्य होती. उजनीच्या सरपंच महिला असूनही उपस्थिती कमी असल्याचे डॉ. गेडाम म्हणाले. ग्रामसभा व इतर कार्यक्रमात महिलांना मोठ्या प्रमाणावर सामावून घ्या. त्यांचे सबलीकरण विकासासाठी महत्त्वाचे आहे.
---------------------------------
रेशन दुकानाची तपासणी
रात्री ११ वाजता बैठक आटोपल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी शाळेतच मुक्काम ठोकला. शनिवारी पहाटे पाचला उठून थंड पाण्यानेच आंघोळ केली. सहा वाजता येथील रेशन दुकानाचे दफ्तर तपासले आणि गावकर्यांचा निरोप घेतला.