‘स्टे होम... स्टे सेफ’ म्हणजे आपापल्या घरात सुरक्षित राहा या संदेशाने देशभरात ‘लॉकडाऊन’ सुरू झाले. कोरोना बाधित लोकांचा संसर्ग होऊ नये म्हणून हा पर्याय स्वीकारावा लागला. सोलापूर हे श्रमिकांचे शहर. कोरोनामुळे गोरगरिबांना रोजीरोटीचे वांदे झाले.बहुसंख्य श्रमिकांना स्वत:ची सुरक्षित घरं नसतात. झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. भाड्याच्या घरात दाटीवाटीने दहा-बारा लोक राहतात. पाण्याची सोय नाही. शौचालये नाहीत. सार्वजनिक शौचालये किंवा उघड्यावर रात्रीच्या अंधारात शौचाला जाणाºया महिलांची आणि मुलांची दयनीय स्थिती असते.
अस्वच्छता त्यांच्या पाचवीला पूजलेली. अशा आरोग्य विघातक आयुष्य जगणारे श्रमिक ‘सुरक्षित’ कसे असू शकतील? त्यात भर पडली लॉकडाऊनची. त्यामुळे जवळजवळ सर्व श्रमिक घरी बसले. त्यांनी खायचे काय आणि घरी बसून करायचं काय? श्रमिकांसाठी लॉकडाऊनचे दिवस म्हणजे जीवघेणे संकट म्हणावे लागेल.. मात्र ज्यांना वेळेवर मासिक वेतन घेणाºया नोकर, कर्मचारी, बुद्धिजीवी मध्यमवर्गीय बहुजन तसेच व्यावसायिक, व्यापारी धनिकांसाठी लॉकडाऊन इष्टापत्तीच ठरली. बहुतेकांनी लॉकडाऊनचा चांगला उपयोग केला. रुटीन बाहेरचा सृजनाविष्कार करण्यात वेळ घालविला. छंद जोपासले.
समाजमाध्यमांचा उपयोग केला. नामवंत लोकांच्या ‘लॉकडाऊन डायºया’ ऐकल्यानंतर ‘आहे रे आणि नाही रे’ वर्गाच्या जगण्यातील दरी मात्र प्रकर्षाने जाणवली. सुरुवातीला सोलापूर शहर तुलनेने सुरक्षित होते. अचानकपणे एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू श्रमजीवी लोकांच्या परिसरात झाल्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलताना दिसतोय. म्हणून श्रमिकांचे आरोग्यभान वाढविल्याशिवाय पर्याय नाही. कोविड १९ आजारावर कोणतेही औषध आणि लस अजूनही उपलब्ध नाही. जगातील अनेक राष्ट्रांनी लोकसहभागातून यावर उपाययोजना केलेली दिसते. आपल्याला देखील लोकसहभाग वाढवावा लागेल. श्रमिकांचे सामूहिक शहाणपण वाढविण्याची गरज आहे. कोरोनाला तर हद्दपार करायचे आहेच त्याचबरोबरीने आपले माणूसपण संपवून चालणार नाही. गेल्या काही दिवसांपासून संशय,चिंता, नैराश्य, खिन्नता, आत्महत्येची मानसिकता बळावत चाललेली दिसते. नकारात्मक मानसिकता असलेली माणसं आपल्या अवतीभवती दिसतात. तेव्हा समाजभान असणाºयांनी ‘किम कर्तव्यम्’ची भूमिका घेता कामा नये. बघता बघता आपल्याकडे सुरक्षित आणि असुरक्षित असे दोन जनसमूह निर्माण होताना दिसतात. हा दुभंग टाळण्यासाठी सुरक्षितांनी असुरक्षित लोकांची काळजी घेतली तरच श्रमिक वर्ग संकटातून बाहेर येऊ शकेल. जनजीवन पूर्वपदावर येईल..
श्रमिक जोपर्यंत सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत शहरातील इतरांचे आरोग्य सुरक्षित होऊ शकणार नाही. वर्षानुवर्षे ज्यांनी शहराच्या विकासासाठी झटले. त्यांच्याशी सुसंवाद साधून सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न करावेत. ज्या श्रमिकांच्या योगदानामुळे आपली शहरं सुरक्षित राहिली त्यांना आपल्यात सामावून घेत कोरोनाविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यापर्यंत लढावी लागणार आहे. बुद्धिजीवी वर्गाकडून श्रमिकांच्या लोकशिक्षणातूनच कोरोना प्रतिबंधक आणि नियंत्रणाचे नवे पर्याय स्थापित होतील. एकंदरीत समाजात स्वत:बरोबर इतरांची सुरक्षितता जपण्याची संवेदनशीलता वाढेल.येत्या काळात सार्वजनिक आरोग्य हाच प्राधान्याचा विषय असणार आहे. हे नक्की.- प्रा. विलास बेत.(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.)