आॅनलाइन लोकमत
सोलापूर दि, 8 - महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात मागील काही दिवसांपासून विविध विषयांवरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद त्वरित संपवून एकीने राहुया, असे विधान कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांनी केले आहे.
सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कन्नड साहित्य संमेलन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मनु बळीगार, संमेलनाचे सर्वाध्यक्ष डॉ. बी. बी. पुजारी, अध्यक्ष बसवराज मसुती, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे एम. बी. पाटील असेही म्हणाले की, महाराष्ट्र कर्नाटक राज्यांचे व्यापार हे कृष्णेच्या पाण्यामुळे चांगले आहेत. दुष्काळी परिस्थितीत सोलापूरला कर्नाटकचे पाणी देण्यासाठी कर्नाटक सरकार सकारात्मक आहे. विजयपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असून त्यासाठी खासदार शरद बनसोडे यांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बसवेश्वरांच्या वचनामुळे साहित्य समृद्ध होत आहे. मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकासाठी कर्नाटक सरकार मदत करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. कन्नड व मराठी वाद नको, आपण भारतीय आहोत, असेही जलसंपदामंत्री पाटील यावेळी म्हणालेत.