करमाळा : लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी सुरू असताना पुणे जिल्ह्यातून काही प्रवासी हे उजनी जलमार्गे करमाळ्यात शिरकाव करतानाचा प्रकार पुढे आला आहे़ मच्छिमार बोटीतूून अवैधरित्या प्रवास करून क रमाळा तालुक्यात कोरोनाचा धोका वाढवत आहेत.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातून भीमा नदी वाहते. माढा तालुक्यातील भीमानगर येथे भीमानदीवर उजनी धरण बांधले गेले. सर्वसाधारणपणे तालुक्यातील जिंतीपासून उजनी धरणात पाणीसाठा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड व सोलापूर ९ जिल्ह्यातील करमाळा, माढा हे भीमा नदीच्या काठावर वसले आहेत.
इंदापूर (पुणे) तालुक्यातून करमाळ्यात (सोलापूर) तालुक्यात उजनी धरणातील जलमार्गाने अर्थात नाव, बोटीच्या माध्यमातून कमी वेळेत पोहोचता येते. कोरोना विषाणूचा फै लाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी केली आहे़ दोन जिल्ह्याच्या सरहद्दीवर तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत़ त्यामुळे सहजासहजी कोणालाही प्रवेश करता येत नाही.
कोरोनाचा प्रकोप पुणे जिल्ह्यात वाढत चालल्याने आपला जीव वाचवण्यासाठी जो तो मिळेल त्या मार्गाने पुणे जिल्हा सोडत आहे. करमाळा तालुक्यात आई-वडील, नातेवाईक यांच्याकडे सुरक्षित राहण्यासाठी येनके न प्रकारे लोक येत आहेत. प्रवासी वाहतुकीसाठी यांत्रिक नाव बंद आहेत़ पण मच्छिमारही पैशाच्या आमिषापोटी बोटीतून प्रवासी वाहतूक करत आहेत.
पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे- करमाळा तालुक्यात सुदैवाने कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही़ पण बाहेरचे लोक बोटीतून येऊ लागल्याने धोका निर्माण झाला आहे. याकडे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख व पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.