तालुक्यात सध्या ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक घराघरात, वाड्यावस्त्यांवरील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांमध्ये धावपळ सुरू आहे. यामधून गावातील कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक गटाकडून वेगवेगळ्या व्यूव्हरचना आखल्या जात आहेत. प्रचार करताना पावणा-रावळा, भावभावकी आदी समीकरणे जुळविली जात आहेत. पावण्याचा पावणा, बाहेरगावी असलेले मतदार आपल्याकडे कसे येतील, यासाठी या उमेदवारांची वेगळी यंत्रणा काम करीत आहे. बाहेरगावच्या उमेदवारांना मतदारानादिवशी किंवा आदल्या दिवशी गावात आणण्यासाठी वाहन, जेवणाची व्यवस्था करून पायघड्या टाकल्या जात आहेत. मात्र, मागील चार महिन्यांपूर्वी कोविडच्या नावाखाली राज्यभर लागू केलेल्या संचारबंदी कालावधीत शहरातील मोठे उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक नागरिक गावाकडे चलाची हाक देत गावाच्या वेशीवर येऊन थांबत होते. मात्र, गावात कोरोना येईल, या भीतीपोटी गावातील अनेक गावपुढारी, नागरिक त्यांना गावात येण्यापासून रोखण्यात मग्न होते. अनेक नागरिकांना तर अपमानास्पद वागणूक देत गावातून रातोरात परत पाठविण्याचे प्रकारही घडले होते. तेच नागरिक आता या गावपुढाऱ्यांना धडा शिकविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. तरीही अनेक उमेदवार नाउमेद न होता त्या नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवत, नात्यागोत्यांची आठवण करून देत गावात मतदानासाठी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.
परगावच्या मतदारांसाठी खास सुविधा
संचारबंदी संपल्यानंतर मोठ्या शहरातील उद्योग व्यवसाय, नोकऱ्या बऱ्यापैकी सुरू झाल्याने गावागावातील चाकरमानी मोठ्या शहरांकडे पुन्हा वळल्याचे चित्र आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांत ग्रामपंचायत निवडणुका आल्याने पुन्हा त्यांना गावाकडून नातलग, गावपुढाऱ्यांचे बोलावणे येत आहे. मात्र, काहीजण गावात पुन्हा लगेच येण्यासाठी अनुत्सुक आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना जेवढे दिवस नोकरी व्यवसायाचे खाडे हाेणार आहे, तेवढा पगार, ये-जा करण्यासाठी खास वाहनाची व्यवस्था, जेवण आदी सुविधा देऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत.