वडवळ : कामाला जाऊ तेव्हा खाऊ, अशी अवस्था खेड्यातील काही शेतमजुरांची आहे. त्यात कोरोनाच्या संकटामुळे अशा लोकांच्या पोटाची भूक स्वस्थ बसू देईना, मात्र यासाठी वडवळकर सरसावले. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना तर सुरू केल्याच, पण गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यातही आघाडीवर राहिले आहेत.
वडवळ येथील वेशीतून आत येताना ग्रामपंचायतीच्यावतीने निर्जंतुक प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे, यातून प्रवेश दिला जात आहे. ग्रामसमन्वय समितीच्या वतीने वेळोवेळी सूचना देऊन याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
लोकमंगलच्यावतीने ग्रामस्थांकरिता मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सध्या बँक कर्मचारी, आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी, औषधे घेण्यासाठी गावाच्या वेशीतून येणाºया लोकांसाठी वेशीमध्ये सॅनिटायझर प्रवेशद्वार करण्यात आले आहे. इथे निर्जंतुक फवारणी करूनच प्रवेश दिला जात आहे.
गावातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात म्हणून कै. हरिभाऊ चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ५१, ज्ञानेश्वर मोरे ग्रामीण पतसंस्था वतीने ५०, श्रीकृष्ण सहकार प्रगती योजनेतून ३९, शिवकृपा बचत गटाच्या वतीने ११ अशा एकूण १५१ कुटुंबांना आवश्यक ते किराणा साहित्य देऊन मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी डॉ. अजिंक्य येळे, साहाय्यक निबंधक जिजाबा गावडे, ज्ञानेश्वर मोरे पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल मोरे, कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, शाहू धनवे, संतोष पवार, रेशन दुकानदार अमोल शिंदे, देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे, माजी ग्रा. पं. सदस्य शहाजी देशमुख, उपसरपंच धनाजी चव्हाण, देविदास लेंगरे, भीमराव मोरे, शाहू शिवपूजे, लोकमंगलचे प्रमाणीकरण अधिकारी तुकाराम यादव, जीवन कहाटे, तात्या मळगे, पोलीस पाटील दादा काकडे, पुनराज शिखरे, गणेश पवार, छोटू पवार उपस्थित होते.