सोलापूर : विमा काढल्यानंतरही चोरीला गेलेल्या दुचाकीचा विमा नाकारणाऱ्या एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला ग्राहक मंचाने ४८ हजार रुपये तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले आहेत. जर ३० दिवसांत पैसे दिले नाहीत तर त्यावर ६ टक्के व्याजदाराने पैसे द्यावे लागतील, असे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार धनराज दत्तात्रय कोंटगुंड (वय २७, रा. तोडकर वस्ती, बाळे) यांनी आपल्या मोटारसायकलचा जानेवारी २०१९ मध्ये एक वर्षाचा ४८ हजार रुपये किमतीचा विमा काढला होता. दरम्यान, एप्रिल २०१९ मध्ये तक्रारदार धनराज यांची दुचाकी शिवस्मारक येथील पार्किंगमधून हरवली. याबाबत त्यांनी तक्रार दिल्यानंतर ११ दिवसांनी गुन्हा दाखल झाला. शिवाय काही तांत्रिक अडचणीमुळे ही बाब त्यांनी कंपनीला १३१ दिवसांनंतर कळवली.
या कारणामुळे विमा कंपनी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी तक्रारदाराचा विमा नामंजूर केला. या प्रकरणी तक्रारदार धनराज यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केल्यानंतर दोन्ही बाजू ऐकून तक्रारदाराला ४८ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. ही रक्कम ३० दिवसांत न दिल्यास आदेशाच्या तारखेपासून दरसाल दर शेकडा ६ टक्के व्याजाने रक्कम तक्रारदाराला द्यावी लागेल, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. यात तक्रारदाराकडून ॲड. रुपेश महेंद्रकर यांनी तर विरुद्ध पक्षातर्फे ॲड. जी. एच. कुलकर्णी यांनी बाजू मांडली.