२६ ऑगस्ट १९५८ रोजी जन्मलेल्या राजाभाऊ सरवदे यांचे प्राथमिक शिक्षण मनपा शाळा क्र. ११ मधून झाले. १९७५ मध्ये जैन गुरुकुल प्रशालेतून एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापुरातील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात डिग्रीला प्रवेश घेतला. महाविद्यालयीन काळात राजाभाऊंनी डॉ. आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ही विद्यार्थी संघटना कार्यान्वित केली. सोलापूर जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या आक्रमक व विद्रोही शैलीने छाप पाडली. एखाद्या गावात अन्याय, अत्याचार घडल्यानंतर तिथे राजाभाऊंची टीम येणार हे कळालं की गावगुंड, समाजकंटक गाव सोडून पळून जायचे. कालातंराने दलित पॅंथर फुटली. त्यानंतर भारतीय दलित पॅंथर स्थापन झाली. राजाभाऊंनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वावर विश्वास टाकला आणि आजतागायत तो सार्थपणे जपला.
ना. रामदास आठवले यांच्या खांद्याला खांदा लावून रिपब्लिकन पक्ष वाढवला. सामाजिक असो वा राजकीय, प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला. रामदास आठवले यांचा निवडणूक प्रचार असो वा राजकीय दौरा, अगदी चोखपणे आपली भूमिका पार पाडत असतात. 'एक पक्ष - एक झेंडा - एक नेता' हे तत्व अंगिकारून राजाभाऊंनी आपल्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. रामदास आठवले यांनी राजाभाऊंची एकनिष्ठता व समाजाप्रती तळमळ ओळखून राज्यमंत्री दर्जा असलेले महात्मा फुले आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. संधीचं सोनं करत राजाभाऊंनी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय दिला. समाजावर संकट ओढवल्यावर पक्षीय भेदाभेद न करता समतेच्या निळ्या झेंड्यास प्रमाण मानून समाजाचे पालकत्व स्वीकारले. रमाबाई आंबेडकर नगरची दंगल असो वा खैरलांजीची दंगल असो, जातीयवाद्यांना सळो की पळो करुन पोलीस प्रशासनावर जरब बसवून समाजास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, अशी गर्जना केली. राजाभाऊंनी त्यांचे विचार कृतीत उतरविले. आज ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सिनेट सदस्य आहेत. इतकेच काय तर ’Pay Back To society’ या सामाजिक तत्त्वाला डोळ्यासमोर ठेवून राजाभाऊंनी भोगाव येथे ‘नालंदा शैक्षणिक संस्थेची उभारणी केली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व ज्यांची परिस्थिती नाही, अशा मुला - मुलींना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक सोय केली. सामाजिक जीवनात राजाभाऊंना अनेक पुरस्कार मिळाले. परंतु एक किस्सा असाच फार कमी लोकांना माहिती आहे. राजाभाऊंना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यांच्या जीवनातील पहिलाच जीवनगौरव पुरस्कार होता. परंतु पुरस्कार हा काँग्रेस प्रणीत संघटनेच्या हस्ते होता. म्हणून राजाभाऊंनी पुरस्कार नाकारला.
आजच्या आंबेडकरी चळवळीला सुगीचे दिवस आले आहेत. कारण राजाभाऊंसारख्या निष्ठेने झटणाऱ्या पिढीने खस्ता खाल्ल्यात. आजच्या युवकांकडून राजाभाऊंना खूप अपेक्षा आहेत. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षात युवकांनी प्रवेश करुन काम करावं, पक्ष संघटना वाढवावी, निळ्या झेंड्याखाली काम करावे. युवकांनी राजकारणात यावं. राजकीय सत्ता हस्तांतरीत करावी, या मतांचे राजाभाऊ येणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त संख्येने प्रतिनिधी निवडून आणतील, हा आशावाद व्यक्त करत राजाभाऊंना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!